जय श्रीराम.
रोहा तालुक्यातील पाटणसई वाडीवर श्रीदत्त जयंतीनिमित्त विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र यांचे कडून आज मंगळवार दिनांक २६ डिसेंबर सायंकाळी ७.०० वा. सामूहिक आरतीचा कार्यक्रम घेण्यात आला. रोहन पवार, नीलम पवार आणि तिच्या आईने अतिशय उत्साहाने आरतीसाठी लागणारी सर्व तयारी केली होती तसेच वाडीतील सर्व घरांमध्ये त्यांनी निरोप दिले होते.
सुरुवातीला सौ. सुलभा गोखले यांनी जमलेल्या मंडळींना श्रीदत्त जयंतीचे महत्त्व सांगितले. तसेच दहावी मार्गदर्शन वर्गविषयी माहिती सांगितली. पुढील वर्षी अधिकाधिक मुले शाळेत नियमितपणे जावीत, त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करावा, पुढील वर्षी दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यापासूनच मार्गदर्शन वर्ग सुरु होणार आहे. कुमारी नीलम पवार आणि कुमार रोहन पवार हे विद्यार्थी अतिशय नियमितपणे वर्गात उपस्थित राहून चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहेत. ते उत्तम प्रकारे दहावीची परीक्षा उत्तीर्ण होतील आणि उच्च शिक्षण घेतील. त्यांच्यामुळे वाडीवरील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल,असे त्यांनी सांगितले.
श्री. मंदार परांजपे सरांनी श्री रामजन्मभूमी अयोध्येमध्ये दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची माहिती सांगितली. तसेच या शुभदिनी दुपारी श्रीरामाची आरती करण्याचे आणि सायंकाळी दिव्यांची रोषणाई करण्याचे आवाहन केले.
सर्व मुलांनी, मुलींनी चांगला अभ्यास करण्याचा, एकमेकांना मदत करण्याचा,आपल्या जातीचा विकास करण्याचा आणि पुढील वर्षी श्रीदत्त जयंती अधिक मोठ्या प्रमाणात उत्साहाने करण्याचा संकल्प ओंकार उद्घोषाने केला.
आरतीला सुमारे ६० मुले - मुली, स्त्री - पुरुष उपस्थित होते. आरतीनंतर जयघोष होऊन प्रसाद देण्यात आला.