सामाजिक समरसता यज्ञाचे आयोजन

24 Feb 2024 17:21:24

img-1

🚩 विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र 🚩
माणगाव, जिल्हा - रायगड
मान्यवर,
 
सप्रेम नमस्कार. जय श्रीराम.
 
विष्णुबुवांच्या जन्मगावी - शिरवली येथे गोडसे कुटुंबियांकडून विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राला ६.३ गुंठे जमीन दान मिळाली आहे. या ठिकाणी शनिवार, माघ शुद्ध अष्टमी शके १९४५ ला (१७ फेब्रुवारी २०२४) सामाजिक समरसता यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.
 
तत्पूर्वी शुक्रवार, रथसप्तमीला (दिनांक १६ फेब्रुवारी २०२४) रात्री १०.०० वा. सौ. श्रद्धाताई भाटे (महाड) यांचे विष्णुबुवांचे चरित्र आणि कार्यावर सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले होते. शिरवली पंचक्रोशीतील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री ९.५५ वा. ते १०.४० वा. वीजपुरवठा खंडित झाला होता, तरीही सर्व बांधव कीर्तनाच्या प्रतीक्षेत शांतपणे बसून होते. अखेर १०.४५ वा. कीर्तन सुरु झाले आणि १२.१५ वा. आरती होऊन समाप्त झाले.
 
शनिवारी सकाळी ९.३० वाजता यज्ञ कार्य सुरू झाले. यज्ञाचे पौरोहित्य श्री. विक्रम विनायक वेद पाठशाळा, रेवदंडा यांचे प्रमुख आचार्य श्री. अजय शर्मा गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी श्री. शिशिर मुळी गुरुजी, श्री. अक्षय लिब्दे गुरुजी आणि सात विद्यार्थ्यांनी केले. यज्ञ कार्याचे यजमान श्री. वसंतराव पोळेकर आणि सौ. प्रतिभाताई पोळेकर होते.
 
यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी शिरवली पंचक्रोशीतील सर्व समाजातील बांधवांनी जोडप्याने आणि वैयक्तिकरित्या सहभाग घेतला. कातकरी - आदिवासी समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यज्ञामध्ये आहुती अर्पण केल्या. यज्ञ कार्यामध्ये केंद्राचे हितचिंतक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. स्व रूपवर्धिनी, पुणे यांचे कार्यवाह श्री. विश्वासराव कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी, डीआरडीओ चे माजी डेप्युटी डायरेक्टर डॉ. श्री. सुहास काणे सर उपस्थित होते. पाहुणे मंडळींनी यज्ञामध्ये आहुती अर्पण केल्या. वेदमंत्रांच्या घोषात यज्ञाहुती देताना प्रत्येकजण भारावून गेल्याचे दिसत होते. यज्ञासाठी माणगाव, रोहा, मुरुड, तळा, पेण, पुणे येथून मंडळी आली होती.
 
पूर्णाहुतीनंतर श्री. अजय शर्मा गुरुजी यांनी त्यांची वेदपाठशाळा आणि यज्ञाविषयी सविस्तर माहिती दिली. केंद्राचे सहसचिव श्री प्रभुदास घरत यांनी सामाजिक समरसता यज्ञाची सामाजिक एकतेसाठी कशी आवश्यकता आहे याचे महत्व सांगून विष्णुबुवांचे चरित्र आणि कार्याची थोडक्यात माहिती सांगितली. ऋणनिर्देशानंतर आरती झाली आणि महाप्रसाद होऊन कार्यक्रम संपला.
शिरवली ग्रामस्थ आणि तुम्हां हितचिंतकांच्या सहकार्याने दोन्ही दिवसांचे कार्यक्रम उत्तम पार पडले. केंद्राचे मार्गदर्शक प. पू. सनातन स्वामी (तिकोना पेठ, पुणे) यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शनाने कीर्तन आणि यज्ञाचा कार्यक्रम यशस्वी झाला.
 
सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 
 
 
सुरेश गोखले
95793 72797
 
 
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- सामाजिक समरसता यज्ञ
Powered By Sangraha 9.0