आधुनिक भारताच्या उभारणीत अनेक ज्ञात अज्ञात महापुरुषांचा सहभाग आहे. यातीलच एक नररत्न म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात जन्मलेल्या निर्भीड, संन्यासी विष्णुबुवांचे चरित्र आणि कार्य अढळ अशा ध्रुव ताऱ्यासारखे सर्वांना मार्गदर्शक आहे.
जातीभेद निर्मूलन, बाल विवाह, विधवा विवाह, शिक्षण, कामगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी हिंदू समाजाचे आग्रहपूर्वक, पोटतिडकीने प्रबोधन केले. त्यासाठी निंदानालस्ती , उपेक्षा सहन केली. जातिभेदांमुळे आपला समाज विस्कळीत झाल्याने आपण पारतंत्र्यात गेलो असा वस्तुनिष्ठ विचार मांडला. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी चालविलेल्या हिंदूंच्या धर्मांतराचा आपल्या लेखणी आणि वाणीने कठोर प्रतिकार केला.
भारताचे उत्थान वेदोक्त धर्माच्या - वेद आणि उपनिषदांनी सांगितलेल्या चिरंतन जीवनमूल्यांच्या आचरणातून होईल असा त्यांचा विश्वास होता.
विष्णुबुवांनी त्यांच्या जन्मगावी शिरवली येथे श्रीदत्तगुरूंच्या पादुका स्थापन केल्या आहेत.