चरित्र

22 Feb 2023 16:34:28

बालपण

 
विष्णुबुवा ब्रह्मचारी हे 19 व्या शतकातील महान समाज सुधारक, हिंदू धर्मरक्षक-प्रचारक म्हणून अोळखले जातात. त्यांचे मूळ नाव विष्णू भिकाजी गोखले. रायगड जिल्ह्यातील शिरवली (ता. माणगाव) या गावी 20 जुलै 1825 रोजी (नागपंचमी-श्रावण शु.5 शके 1747) एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आर्इचे नाव उमाबार्इ. ते पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वयाच्या नवव्या वर्षी ते जमीन महसूल खात्यात कामाला लागले. परंतु घरच्या अडचणींमुळे त्यांना नोकरी सोडून आपल्या आर्इच्या मदतीसाठी घरी यावे लागले. पुढे त्यांनी महाडला एका किराणा मालाच्या दुकानात काम केले. त्यानंतर 13 - 14 व्या वर्षी साष्टी तालुक्यातील सीमाशुल्क (कस्टम) खात्यात नोकरीस लागले. पुढे वसर्इ, कल्याण, भिवंडी व उरण इ. ठिकाणी त्यांनी नोकरी केली. त्यांचा स्वभाव धार्मिक आणि अध्यात्मिक होता. त्यामुळे प्रवचन, कीर्तन व भजन यात ते मोठया आवडीने सहभागी होत असत. त्याचप्रमाणे पांडवप्रताप, हरिविजय, ज्ञानेश्वरी, दासबोध अशा अनेक धार्मिक ग्रंथांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता.
  

ध्येय निश्चिती

 
वयाच्या 23 व्या वर्षी विष्णुबुवांना आपला जन्म परोपकारासाठी असल्याची र्इश्वरी प्रेरणा झाली आणि आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी नाशिकला प्रयाण केले. तेथे सप्तश्रृगींच्या डोफ्लगरावर कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. लोकांना आपल्या उज्वल आणि श्रेष्ठ धर्माची अोळख करून देण्यासाठी आपल्याला लाभलेल्या वेदोक्त धर्माचा मार्ग आपल्या बांधवांनाही दाखविला पाहिजे याची त्यांना खात्री पटली. धर्माच्या नावाखाली माजलेल्या अनाचाराचे अवास्तव स्तोम मोडून काढण्याचे आणि विदेशी पाखंड मतांचे खंडन करून वेदोक्त धर्माची पुनःस्थापना करण्याची त्यांना परमेश्वरी आज्ञा झाली. त्यानंतर विष्णुबुवा नाशिकमार्गे पंढरपूरला आले. तेथे त्यांनी भावार्थ रामायणाची दोन पारायणे केली आणि लोकांना वेदोक्त धर्माची महत्ता सांगण्यास प्रारंभ केला. त्यांनी वैदिक धर्माचे वास्तव स्वरूप जनतेसमोर आणण्यासाठी ‘भावार्थ सिंधू’ (1856) ग्रंथ लिहिला. येथे त्यांचा श्री. महादेवशास्त्री कोल्हटकर यांच्याशी परिचय झाला. त्यांच्या सांगण्यावरून विष्णुबुवांनी सांगली, मिरज, वार्इ, सातारा, पुणे, अहमदनगर व कोल्हापूर येथे वेदोक्त धर्मावर व्याख्याने दिली. त्यानंतर द्वारकेला जाण्यासाठी म्हणून सप्टेंबर 1856 मध्ये मुंबर्इत आले. मुंबर्इमध्ये त्यांना ख्रिश्‍चन मिशनऱ्यांचा धर्म आणि सेवा यांच्या नावाखाली सुरु असलेल्या कुटील कारवायांची अोळख झाली. इंग्रजांनी केवळ राजसत्ताच बळकावलेली नाही, तर मिशनऱ्यांव्दारे हिंदू समाजावर त्यांचे सांस्कृतिक आणि धार्मिक आक्रमण चालू आहे, हिंदूचे धर्मांतर करण्याचे त्यांचे षडयंत्र आहे याची जाणीव होऊन त्याला प्रखर विरोध करून आळा घालण्याचा त्यांनी निर्धार केला.
 

वेदोक्त धर्मरक्षण अर्थात हिंदू धर्मरक्षण

 
ख्रिश्‍चन मिशनऱ्यांनी हिंदू धर्मग्रंथांच्या हस्तलिखितांमधून ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या कार्याला उपयोगी पडतील अशी हिंदू धर्मातील दोषस्थळे निवडून काढलेली होती आणि त्या आधारे ते हिंदू धर्मावर खोडसाळ टीका करत होते. विष्णुबुवांनी याला प्रत्युत्तर म्हणून लहान मोठया बैठकांतून समाज प्रबोधनाला सुरूवात केली. प्रत्येक शनिवारी गिरगावातील प्रभू सेमीनरीत त्यांची व्याख्याने होत असत. अशा एकूण 50 सभा झाल्या. या सभांच्या माध्यमातून त्यांनी ख्रिश्‍चन मिशनऱ्यांच्या अश्‍लील आणि खोडसाळ टिकेचा प्रभावीपणे प्रतिवाद केला. विष्णुबुवांचे वक्तृत्व आणि वादविवाद कौशल्य अत्यंत प्रभावी होते. 15 जानेवारी 1857 ते 28 मे 1857 या कालावधीत प्रत्येक गुरूवारी संध्याकाळी मुंबर्इच्या समुद्र किनाऱ्यावर त्यांच्या ख्रिश्‍चन मिशनऱ्यांसोबत जाहीर चर्चा, सभा झाल्या. तेथे ख्रिश्‍चन मिशनरी जी. जॉर्ज बोवेन येत असे. त्याने ह्या चर्चांचे संकलन ‘Discussions By The Seaside’ (1857) ह्या पुस्तकात केले आहे. त्याचा मराठी अनुवाद ‘समुद्रकिनारीचा वादविवाद’ (1872) मध्ये झाला. विष्णुबुवांनी कलकत्ता, चेन्नर्इ, वाराणसी येथे जाऊन आपल्या समाजप्रबोधनाव्दारे हिंदू धर्मरक्षणाचे आणि प्रसाराचे महान कार्य केले आहे.
 

सामाजिक सुधारणा

 
आपण जातीपातिंमध्ये विभागले गेलो असल्याने आपण पारतंत्र्यात गेलो. आपल्याला अत्याचार आणि आक्रमणे सहन करावी लागली असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे विष्णुबुवांनी हिंदू समाजातील जाती व्यवस्था, अस्पृश्‍यता आणि स्त्री दास्यत्व या कुप्रथांना कडाडून विरोध केला होता. पुनर्विवाह, प्रौढविवाह, घटस्फोट, शुध्दीकरण, मंदिर प्रवेश इत्यादी सामाजिक प्रश्नांसंबंधी त्यांनी आपले पुरोगामी विचार आग्रहाने मांडले. स्त्रीदास्यत्व नष्ट करावयाचे असेल, तर स्त्रीशिक्षणाशिवाय पर्याय नाही असे त्यांचे ठाम मत होते. ‘वेदोक्त धर्मप्रकाश’ (1859) आणि ‘सुखदायक राज्यप्रकरणी निबंध’ (1867) ह्या त्यांच्या ग्रंथांमध्ये त्यांचे प्रागतिक विचार विशेषत्वाने व्यक्त झाले आहेत. ‘राज्यकारभार चालवणारे कामगार’ कधीही वंशपरंपरेने नेमता कामा नयेत असे स्पष्टपणे सांगितले आहे. राज्यात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीची जन्म, मृत्यू, शिक्षण, विवाह, प्रवास यांची नोफ्लद शासनाने ठेवावी अशा अनेक महत्वाच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
  

समतावादी आणि राष्ट्रवादी विचार

 
इंग्रज शासन काळात भारतात मोठया प्रमाणात यांत्रिकीकरण झाले. कारखानदारी निर्माण होऊन कामगार वर्ग उदयास आला. विष्णुबुवांनी कामगारांच्या दयनीय अवस्थेचे चित्रण आणि त्यांच्या संबंधीचे विचार सुखदायक राज्यप्रकरणी निबंध (Essays On Beneficent Government) या ग्रंथात मांडले आहेत. त्यांचा हा ग्रंथ म्हणजे एक आदर्श राज्यकल्पना आहे. त्यांनी या ग्रंथाचे इंग्रजीमध्ये भाषांतर करून घेतले आणि ते 1869 मध्ये प्रकाशित केले. त्याच्या 10,000 प्रती छापून इंग्लंडची राणी व्हिक्टोरियासह देशविदेशातील गणमान्य व्यक्तिंना पाठविले. विष्णुबुवांनी रचिलेल्या अन्य उल्लेखनीय ग्रंथांमध्ये चतुःश्‍लोकी भागवत याचा अर्थ (1867), सहजस्थितीचा निबंध (1868) आणि त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या वेदोक्त धर्माचा विचार व ख्रिस्तीमत खंडन (शिकवणुकीचे सार; 1874), सेतुबंधनी टीका (1890) यांचा समावेश होतो. ‘सेतुबंधनी टीका’ हे भगवद्गीतेवरील निरूपण आहे. ‘अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा सेतू’ असे ह्या टीकालेखनाचे स्वरूप आहे. भावार्थ सिंधू या त्यांच्या ग्रंथाचे गुजराथी भाषेत आणि वेदोक्त धर्मप्रकाश या ग्रंथाचे भोजपुरी भाषेत भाषांतर झाले. विष्णुबुवांनी प्रबोधनासोबत गावोगावी वाचनालये, वर्तमानपत्रे स्थापण्यासाठी पुढाकार घेतला, प्रोत्साहन दिले. विष्णुबुवांच्या विचारप्रर्तक व्याख्यानांमुळे हिंदू आणि पारशी समाजात मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाली आणि त्यांचा धर्माभिमान जागृत झाला. त्यामुळे ख्रिश्‍चन मिशनऱ्यांच्या धर्मप्रचाराला आळा बसला, मिशनऱ्यांचा चौखूर उधळलेला वारू रोखला जाऊन हिंदू आणि पारशी समाजाची धर्मांतरे थांबली.
  

राष्ट्रवाद आणि सामाजिक हिंदुत्वाचे उद्गाते

 
विष्णुबुवांना त्यांच्या पवित्र कार्यामध्ये सर जीजीभॉय जमशेटजी, जगन्नाथ शंकरशेठ, हरी केशवजी, शेठ गोकुळदास तेजपाल, भाऊदाजी लाड, विनायकरावजी वासुदेव, नारायण दिनानाथजी, दादोबा पांडुरंग, दादाभार्इ नवरोजी अशा अनेक महानुभावांची साथ मिळाली. विष्णुबुवांना अक्कलकोट मुक्कामी श्री. स्वामी समर्थांचा सहवास, मार्गदर्शन आणि कृपाप्रसाद लाभला होता. गिरगाव, मुंबर्इ येथे 18 फेब्रुवारी 1871 (महाशिवरात्री - माघ वद्य चतुर्दशी शके 1792) रोजी त्यांचे निधन झाले. केवळ 46 वर्षांच्या आयुष्यात, हालअपेष्टांची चिंता न करता, स्वकीय आणि परकीय लोकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून आणि अवहेलना स्विकारून विष्णुबुवांनी समाजप्रबोधनाचे आणि हिंदुधर्म रक्षणाचे महान कार्य केले. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात जन्मलेल्या राष्ट्रवादाचे आणि सामाजिक हिंदुत्वाच्या संकल्पनेचे विष्णुबुवा हे उद्गाते आहेत.
Powered By Sangraha 9.0