🚩 विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र 🚩
माणगाव, जिल्हा रायगड
🙏 जय श्रीराम.
शिवजयंतीच्या शुभदिनी (फाल्गुन वद्य तृतीया) सोमवार, १७ मार्च २०२५ रोजी विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राच्या वतीने शिरवली पंचक्रोशीतील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना भविष्यात उच्च शिक्षण / व्यवसाय यांचे योग्य पर्याय निवडण्याच्या दृष्टीने मदत व्हावी म्हणून विद्यार्थी आणि पालकांसाठी बोरवाडी येथील श्रीमती सुशीला काशिनाथ भाटे माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत व्यवसाय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यातआले होते.
शिबिराचा प्रारंभ दीप प्रज्वलन आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय समितीचे अध्यक्ष श्री. संतोष पवार यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘उसळत्या रक्तात माँ ज्वालामुखीचा दाह दे, वादळाची दे गति पण भान ध्येयाचे असू दे’ हे सामूहिक गीत म्हटले.
श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट यांच्या डेरवण, जिल्हा रत्नागिरी येथील बी के एल वालावलकर रुग्णालयातील प्राध्यापक श्री. मंदार जोशी यांनी विद्यार्थ्यांना १० वी आणि १२ वी नंतरचे विविध पर्याय तसेच वैद्यकीय क्षेत्राशी निगडित पदवी आणि पदविका अभ्यासक्रम तसेच कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत अभ्यासक्रमांची माहिती PPT सह दिली. यामध्ये नर्सिंग आणि पॅरामेडिकल कोर्सेसचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तेथे उपलब्ध असलेल्या शैक्षणिक आणि क्रीडा विषयक सुविधांची माहिती मिळाल्यावर विद्यार्थ्यांना आनंद झाल्याचे जाणवत होते.
गो संवर्धन आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत असलेले हर्णेवाडी, तालुका माणगाव, जिल्हा रायगड येथील श्री. राजेश माटे यांनी त्यांच्या 'गव्य' या संस्थेकडून पंचगव्याचा उपयोग करून तयार केलेल्या औषधे, दंतमंजन, हस्तकलाकृती यांची माहिती दिली. श्री. माटे २०१७ पासून त्यांच्या मुंबईतील यशस्वी व्यवसायाची उलाढाल जाणीवपूर्वक कमी करुन ग्रामीण भागातील नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा पुरस्कार करण्यासाठी त्यांचे गावी हर्णेवाडी येथे आपल्या कुटुंबासहित स्थायिक झाले. पंचगव्य वापरून तयार केलेल्या उत्पादनांची विक्रीतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अर्थार्जनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत याबद्दल श्री. माटे यांनी माहिती दिली. अशी उत्पादने तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याची जबाबदारी श्री. माटे यांनी घेतली आहे.
दिनांक १७ मार्च २०२५ या दिवशीच १० वी बोर्ड परीक्षेचा शेवटचा पेपर होता. परीक्षा संपल्यावर लगेच विद्यार्थी शिबिरासाठी आले होते. यामध्ये बोरवाडी, शिरवली येथील ५५ विद्यार्थी तसेच पाटणसई वाडीच्या इयत्ता १० वी मार्गदर्शन अभ्यासिकेतील पाच विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदान आणि जयघोषांनी झाली.शिबिर यशस्वी होण्यासाठी बोरवाडी आणि शिरवली च्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा समितीचे सहकार्य लाभले.आनंदाची गोष्ट अशी की पाटणसई वाडीच्या २ विद्यार्थिनींनी सहाय्यक परिचारिका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचे निश्चित केले आहे.
अनेक शुभेच्छा.
सुरेश गोखले,
(सचिव)
95793 72797
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- विष्णुबुवा ब्रह्मचारी द्विशताब्दी जन्मोत्सव पुण्यात संपन्न