विष्णुबुवा ब्रह्मचारी द्विशताब्दी जन्मोत्सव पुण्यात संपन्न

विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र    21-Feb-2025
Total Views |
img 
 
७ फेब्रुवारी २०२५
 
🕉️
 
विष्णुबुवा ब्रह्मचारी द्विशताब्दी जन्मोत्सव पुण्यात संपन्न .....
 
एकोणिसाव्या शतकातील थोर समाज सुधारक, हिंदू धर्मरक्षक - प्रचारक, आणि सामाजिक हिंदुत्त्वाचे उद्गाते विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सवानिमित्त पुण्यातील उद्यान प्रसाद सभागृहात मंगळवार दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राचे श्री. सुरेश गोखले यांचे ‘द्रष्टा संन्यासी: विष्णुबुवा ब्रह्मचारी’ या विषयावर व्याख्यान झाले.
 
आपल्या भाषणात श्री. गोखले यांनी विष्णुबुवांच्या काळातील सामाजिक,राजकीय परिस्थिती, देशभर पसरलेला ब्रिटिश राजसत्तेचा अंमल या पार्श्वभूमीवर विष्णुबुवांनी केलेल्या हिंदू धर्मरक्षणाच्या कार्याचे महत्त्व विशद केले.
काळाच्या ओघात वेदोक्त हिंदू धर्मात शिरलेल्या अनुचित चालीरीती, भेदभाव यांवर विष्णुबुवांनी कडाडून टीका केली. बैठका,भाषणे आणि ग्रंथामधून सामाजिक सुधारणा, जातीभेद - अस्पृश्यता निर्मूलन, महिला सबलीकरण, कामगारांचे हक्क, लोककल्याणकारी राज्यव्यवस्था आणि सक्तीचे शिक्षण अशा विषयांचे आग्रहाने प्रतिपादन केले.
 
ब्रिटिश राजसत्तेच्या पाठिंब्याने आणि सेवाकार्याचा बुरखा पांघरून हिंदूंचे धर्मांतर घडवून आणणाऱ्या, हिंदू धर्माच्या तत्वज्ञानावर, हिंदूंच्या धार्मिक साहित्यावर, देवदेवतांवर निराधार अश्लील टीका करणाऱ्या ख्रिश्चन मिशनऱ्यांना खुले आव्हान देऊन विष्णुबुवांनी त्यांच्याशी जाहीरपणे वादविवाद केले. गिरगावातील प्रभू सेमिनरी या शाळेत आणि अन्य ठिकाणी विष्णुबुवांच्या ५० सभा झाल्या. तसेच १५ जानेवारी १८५७ ते २८ मे १८५७ या काळात गिरगावच्या समुद्र किनाऱ्यावर विष्णुबुवा आणि ख्रिश्चन मिशनरी यांच्या २० वादविवाद सभा झाल्या. यामध्ये ख्रिश्चनांच्या बाजूने रेव्ह. जॉन विल्सन, जॉर्ज बोवेन, बॅलेन्टाईन, वोलेस , दाजी पांडुरंग, नारायण शेषाद्री सहभागी होते. या सभांना हजारोंच्या संख्येने समाजाच्या विविध स्तरांतील, जातीतील लोक उपस्थित राहत असत. ख्रिश्चन मिशनऱ्यांचा प्रतिवाद करताना त्यांचेच शस्त्र विष्णुबुवांनी प्रभावीपणे वापरले. बायबलचा बारकाईने अभ्यास करून त्यातील दोषस्थळे, विसंगती लोकांसमोर मांडल्या. विष्णुबुवांच्या तर्कशुद्ध मांडणीपुढे ख्रिश्चन मिशनरी निष्प्रभ होत असत. विष्णुबुवांनी आपल्या जीवनकार्याच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्राचं नव्हे तर तामिळनाडू, बंगाल, उ. प्रदेश, गुजरात या राज्यांचा प्रवास करून ख्रिश्चन मिशनऱ्यांविरुद्द हिंदूंना जागृत केले.परधर्मात गेलेल्या बांधवांना परत हिंदू धर्मात आणले.
 
‘भावार्थ सिंधू’ या विष्णुबुवांच्या ग्रंथातील ओव्या श्री. सुरेश गोखले यांनी आपल्या व्याख्यानात उद्धृत केल्या. ‘सकलद्वीपे सकलखंडे मुक्ते फिरावी उदंडे, मोडोनि मतवादांची बंडे उपदेश ज्ञानाचा करावाI ‘ या ओवीतून त्यांचा हिंदू धर्मरक्षणाचा आणि परमत खंडन करण्याचा निर्धार दिसून येतो. असे करण्याची आज्ञा त्यांना श्री दत्तात्रेयांकडून मिळाली होती असे त्यांनी ‘हकीकत’ या आपल्या छोट्याशा आत्मकथनात लिहून ठेवले आहे.‘सेतुबंधनी टीका’ या भगवद्गीतेवरील भाष्यात त्यांनी अध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे. श्री. गोखले यांनी विष्णुबुवा ब्रह्मचारी केंद्राद्वारे आयोजित केलेल्या विविध उपक्रमांची आणि सेवाकार्यांची माहिती सांगून केंद्राच्या गेल्या तीन वर्षातील कार्याचा आढावा घेतला.
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी बँक ऑफ बडौदाचे माजी संचालक श्री. व्ही.जी. चव्हाण, श्री. डोळे, रिलायन्स इंडस्ट्रीज, नागोठणे माजी अध्यक्ष श्री. सदानंद यादवाडकर, स्वरूप वर्धिनीचे सचिव श्री. शिरीष पटवर्धन, श्री. विश्वास कुलकर्णी आणि सहकारी, ओंकार ट्रस्टचे पदाधिकारी श्री. शिवले, चाणक्य मंडळाचे श्री. प्रवीण जगताप, सेवा इंटरनॅशनलचे श्री. प्रसाद शिरसीकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राच्या विश्वस्त मंडळ सदस्य सौ. प्रतिभाताई पोळेकर या मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. सेवावर्धिनी संस्थेचे प्रकल्प समन्वयक श्री. प्रमोद कुलकर्णी, पुणे नगर वाचन मंदिराचे पदाधिकारी श्री. अरविंद रानडे कार्यक्रमाला उपस्थित होते. विविध क्षेत्रात कार्यरत असणारे कार्यकर्ते आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राचे हितचिंतक, देणगीदार असे एकूण १२५ महिला - पुरुष कार्यक्रमाला उपस्थित होते.
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सहकार भारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. मुकुंदराव तापकीर यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘काळाच्या पडद्याआड गेलेल्या एका महान संन्याशाचे जीवन चरित्र पुन्हा एकदा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र करत आहे. तसेच केंद्राच्या माध्यमातून विविध सेवाकार्ये सुरु आहेत. या कार्याला आवश्यक पाठबळ आम्ही पुण्यातून उभे करू.’
 
यावेळी विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘भक्ती सिंधू’ या पुस्तिकेच्या द्वितीय आवृत्तीचे वितरण उपस्थितांना करण्यात आले. कार्यक्रमाचा शेवट सौ. रसिका जोशी यांचे पसायदान आणि सामूहिक जयघोषांनी झाला.
व्याख्यानाच्या आधी रथसप्तमीनिमित्त तिळगूळ समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर झालेल्या अल्पोपहाराच्या वेळी उपस्थितांच्या अनौपचारिक गप्पा झाल्या. यावेळी हितचिंतकांनी केंद्राच्या कार्यवृद्धीच्या दृष्टीने अनेक उपयुक्त सूचना केल्या.
 
विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सवानिमित्त पुणे शहरात झालेला हा कार्यक्रम सौ. स्मिता देसाई आणि श्री. हेमंत देसाई आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नातून संपन्न झाला.
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा. 🌺🌻🪷
 
सौ. सुलभा गोखले 
वेबसाईट - vishnubuvabrahmachari.com
 

अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- विष्णुबुवा ब्रह्मचारी द्विशताब्दी जन्मोत्सव पुण्यात संपन्न

सविस्तर बातमी या लिंकवर वाचा:- विष्णुबुवा ब्रह्मचारी द्विशताब्दी जन्मोत्सव पुण्यात संपन्न

महत्वपूर्ण बातम्यांसाठी खालील लिंकद्वारे लोकजागर च्या whatsapp group ला जॉईन व्हा !:- विष्णुबुवा ब्रह्मचारी द्विशताब्दी जन्मोत्सव पुण्यात संपन्न