२४ जून २०२४.
🚩 विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र 🚩
llॐll
सप्रेम नमस्कार. जय श्रीराम.
चि. नीलम पवार आणि चि. रोहन पवार यांचा कौतुक सोहोळा
पाटणसई वाडीतील (कातकरी जनजाती) चि. नीलम पवार आणि चि. रोहन पवार यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत अभ्यास करून १० वी बोर्डाच्या परीक्षेत यश मिळवले. कोरोना काळात शालाबाह्य झालेल्या या दोघांनी मार्च २०२४ मध्ये परीक्षा दिली होती. रविवार दि. २३ जून २०२४ रोजी पाटणसई वाडीतील समाजमंदिरात संध्याकाळी ६.३० वा. त्यांचा कौतुक सोहोळा आयोजित केला होता. या सोहोळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. मंदार परांजपे यांनी मनोगत व्यक्त केले. मुलांच्या परिश्रमाचे त्यांनी कौतुक केले.
श्री. मंदार परांजपे, सौ. श्वेता परांजपे आणि सौ. सुलभा गोखले यांच्या हस्ते गुलाबपुष्प, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन नीलम आणि रोहन यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राचे सचिव श्री. सुरेश गोखले यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले,”नीलम आणि रोहन अत्यंत कठीण परिस्थितीत न कंटाळता मार्गदर्शन वर्गात नियमित उपस्थित राहत. शारीरिक कष्टाची कामे करून कुटुंबासाठी अर्थाजन करत त्यांनी बोर्डाच्या परीक्षेची तयारी केली. वाडीवरील सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांचे उदाहरण प्रेरणादायी आहे. त्या दोघांनीही पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. संपूर्ण समाजाचा विकास व्हायला हवा असेल तर समाजातील जो दुबळा, वंचित, अशिक्षित घटक आहे त्याचा विकास होणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. कातकरी जनजातीने शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींकडे लक्ष दिले तर ते दिवस दूर नाहीत की जेव्हा कातकरी समाजातील मुले / मुली उच्चपदावर विराजमान झालेले असतील.” विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राच्या वतीने सर्व प्रकारची मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. समाजावरील आक्रमणांना तोंड देण्यासाठी तसेच देव, देश आणि धर्म यांच्या संरक्षणासाठी आपण एकत्र प्रयत्न करू या असे आवाहन त्यांनी केले.
१० वी मार्गदर्शन वर्गासाठी गावकऱ्यांनी पाटणसई वाडीतील समाज मंदिर वापरण्यास दिले होते, विजेची सोय करण्यात आली. वह्या - पुस्तके, अन्य स्टेशनरी, रायटिंग डेस्क, वीजबिल, एका होतकरू शिक्षिकेचे मानधन असा या मार्गदर्शन वर्गाचा खर्च दानशूर आणि संवेदनशील हितचिंतकांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे करणे शक्य झाले. काही मंडळींनी मोबाईल फोनचा उपयोग करून पाठ्यपुस्तकातील पाठांचे अभिवाचन करून मदत केली. कार्यक्रमामध्ये या सर्वांचा ऋणनिर्देश करण्यात आला. तसेच मार्गदर्शन वर्गात शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांचा सत्कार आणि ऋणनिर्देश करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित असलेले रोहन आणि नीलमचे आजोबा, रोहनची आई, मावशी, वाडीतील अन्य मंडळी यांना हा कौतुक सोहळा पाहून गहिवरून आले होते. मुलांच्या पुढील शिक्षणासाठी आम्ही सदैव पाठिंबा देऊ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक आरती झाली आणि प्रसाद वाटप करण्यात आले.
या शैक्षणिक वर्षात जुलै २०२४ मध्ये सुरु करण्यात आलेल्या मार्गदर्शन वर्गाचा लाभ वाडीवरील ३ शालाबाह्य विद्यार्थी घेत आहेत. लवकरच ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच माणगाव, पेण आणि महाड तालुक्यातही अशा प्रकारचे मार्गदर्शन वर्ग सुरु करण्याचे प्रयत्न केंद्राचे कार्यकर्ते करत आहेत.
या ईश्वरी कार्यासाठी तुमचे प्रेम आणि सहकार्य आहेच.
अनेक शुभेच्छा.
आपले ,
विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र
माणगाव, जिल्हा - रायगड
(९५७९३७२७९७)
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र