गुरुवार,
३ ऑगस्ट २०२३
जय श्रीराम.
प्राथमिक शाळा, कुडली (तालुका - रोहा, जिल्हा - रायगड) ही जिल्हा परिषदेची शाळा असून या शाळेत आंबिवली, कुडली, सरफळे वाडी या गावांतून एकूण १०५ मुले येतात. आनंदाची गोष्ट अशी की यामध्ये बहुजन समाजाच्या बरोबरीने कातकरी जमातीतील मुले मुली मोठ्या संख्येने शाळेत येत आहेत. यासाठी पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि शालेय समिती यांचे विशेष अभिनंदन करावेसे वाटते.
आज या शाळेत आम्ही शैक्षणिक साहित्य देण्यासाठी गेलो होतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही सर्वांनी पंढरीच्या वारीला वारकरी चालला... हा अभंग सामूहिक गायिला. मुलांशी गप्पा झाल्या. त्यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राकडून गरजू विद्यार्थ्यांना एकरेघी, दुरेघी, चार रेघी, चौकटी वह्या तसेच चित्रकला वह्या, फूट पट्ट्या, पेन्सील, खोड रबर, रंगपेट्या दिल्या. यावेळी समर्थ मठ, कुडली चे पुजारी श्री. तात्याराम कटे उपस्थित होते.
खरं सांगायचं तर गेल्या आठवड्यातच हे साहित्य शाळेमध्ये द्यायचे होते. परंतु मुसळधार पावसामुळे शाळेला खूप सुट्ट्या मिळाल्या. त्यामुळे थोडा उशीर झाला .
समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रत्येकाने शिकले पाहिजे, शासनाने तशी व्यवस्था उभी केली पाहिजे असे विष्णुबुवांचे आग्रहाचे सांगणे होते. विष्णुबुवांचा आदर्श समोर ठेवून गरीब, उपेक्षित मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी आपण हातभार लावत आहोत.
पसायदान आणि जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यपिका सौ. सुशिला म्हात्रे, शिक्षक - श्री. मोहन राठोड आणि सौ. रामधरणे यांचे उत्तम सहकार्य लाभले.
परत लवकर भेटण्याचे ठरवून आम्ही मुलांचा निरोप घेतला. शाळेच्या शेजारी असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात हा कार्यक्रम झाला.
आपण सर्वांच्या अमूल्य सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत.
अनेक शुभेच्छा.
सुरेश गोखले
95793 72797