रविवार,
दिनांक ६ ऑगस्ट,२०२३
आज विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्रा द्वारे नागोठणे येथील जैन हॉल मध्ये किशोरी आणि युवती मेळावा आयोजित करण्यात आला होता. इयत्ता ८ वी आणि त्यावरील वयोगटातील १४४ मुली आणि २१ पालक महिला या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अंकिता वडे यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय श्रीमती श्वेता परांजपे यांनी करून दिला. प्रास्ताविक सौ.सुलभा गोखले यांनी केले. विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राचे सचिव श्री. सुरेश गोखले यांनी मुलींकडून ‘वाघाच्या जबड्यात घालुनी हात .....’ हे गीत सांघिकरीत्या म्हणून घेतले.
या कार्यक्रमाला मुंबई तरुण भारतच्या उपसंपादिका श्रीमती योगिताताई साळवी या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. आपल्या मुली वेगवेगळ्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करून यशाची नवीन शिखरे सर करीत आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मुलींनी आपल्या अलौकिक प्रतिभेने ठसा उमटविला आहे. परंतु या स्पर्धेच्या,धावपळीच्या जगात मार्गदर्शन किंवा चर्चा, हितगुज,सल्लामसलत यांच्या अभावी मुली नकळत अनेक प्रलोभनांना बळी पडतात आणि ध्येयप्राप्ती होत नाही. घरातील सुरक्षित वातावरण आणि चांगुलपणा बाहेरच्या जगात मिळेलच असे नाही.आईवडील रक्ताचे पाणी करुन, हाडांची काडे करुन मुलींना चांगले शिक्षण मिळावे यासाठी झटतात. मुलींनी क्षणिक प्रलोभनांना बळी पडू नये. विविध प्रलोभने, गोड शब्द, खोटी आश्वासने देऊन मुलींची फसवणूक केली गेल्याचे प्रकार अवतीभवती घडत असतात. त्यामुळे पुढील आयुष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतात. अनेक जणी कायमच्या उध्वस्त होतात. योगिताताईंनी आपल्या व्याख्यानात अगदी अलीकडच्या काळात घडलेल्या काही सत्य घटनांची उदाहरणे दिली.
आयुष्याचे ध्येय ठरवायचे तर त्यासाठी तयारी केली पाहिजे, वेळेचे नियोजन केले पाहिजे.घडलेली प्रत्येक गोष्ट आईला, कुटुंबातील वडिलधाऱ्यांना सांगावी. खरे निरपेक्ष प्रेम आईवडिल आणि कुटुंबियच करीत असतात. मुलींनी आपले जीवन अतिशय सुंदर, खंबीरपणे आणि पावित्र्याने उभे करावे आणि आपल्या जीवनात येणाऱ्या हीन संकटांना ओळखून त्यांचा प्रभावीपणे सामना करावा याबद्दल श्रीमती योगिताताईंनी उपस्थित मुलींशी संवाद साधला.
त्यानंतर मुलींचे इयत्तेप्रमाणे वेगवेगळे गट करून चर्चा घेण्यात आली. त्यात मुलींनी आपली मते,अनुभव सांगितले. आईवडिलांशी मोकळेपणाने चर्चा करू, मनःशक्तीसाठी प्राणायाम, ध्यानधारणा, योग करू, स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण घेऊ, कुटुंब आणि स्वधर्माबद्दल अभिमान बाळगू आणि उत्तम आयुष्य घडवू असा मुलींनी निश्चय केला.
कार्यक्रमाचा समारोप नागोठण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि परांजपे क्लासेसचे संचालक श्री. मंदार परांजपे यांनी केला. श्रीमती विद्या बाक्कर यांनी आभार मानले. शेवटी पसायदान आणि जयघोष होऊन कार्यक्रम संपला.
जैन आराधना भवन ट्रस्ट, नागोठणे यांनी कार्यक्रमासाठी हॉल नि:शुल्क उपलब्ध करून दिला होता. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी नागोठण्यातील श्रीमती प्राची गोळे, विजया परमार, रीना मोदी, श्री. विवेक रावकर आणि अनेक कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम केले.
सुरेश गोखले
95793 72797